सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालिन न्यायाधीशांनी लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार आणखी एका प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने केली आहे. निवृत्त झालेल्या संबंधित न्यायाधीशांविरुद्ध लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप करणाऱया वकील महिलांची संख्या आता दोन झालीये. 
सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर संबंधित महिलेने आपल्यावरील प्रसंगाबाबत ११ नोव्हेंबर रोजी माहिती दिली होती. मात्र, आता ती काढून टाकण्यात आली आहे. लिगली इंडिया या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोलकात्यातील कायदेविषयक शिक्षण देणाऱया एका नामांकित संस्थेतून संबंधित महिलेने शिक्षण घेतले आहे. तिने फेसबुक खात्यावर स्वतःवरील लैंगिक छळवणुकीबद्दल माहिती दिली होती. एकूण तीन वेळा तिची लैंगिक छळवणूक करण्यात आली, असे तिने लिहिले होते.
दरम्यान, याआधी एका शिकाऊ वकील महिलेने त्याच न्यायाधीशांवर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला होता. तिने केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांची समिती नेमली आहे. डिसेंबरमध्ये ज्या वेळी दिल्लीत एका मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण मोठय़ा प्रमाणात चर्चिले जात होते, त्याच वेळी या न्यायाधीशाने त्यांच्याकडे शिकाऊ म्हणून काम करीत असलेल्या वकील महिलेशी लैंगिक छळवणूक केली होती. त्या महिलेने आता या सगळ्या प्रकरणाची वाच्यता केली असून, त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. सदर न्यायाधीश आता सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले आहेत.