पश्चिम बंगालमधील बारखपूरचे तृणमूल काँग्रेसचे आमदार शीलभद्र दत्ता यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. मात्र आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या २४ तासांत तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडणारे ते तिसरे प्रमुख नेते आहेत.

दत्ता हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना ईमेलद्वारे  राजीनामापत्र पाठविले आहे. पश्चिम बंगालमध्ये मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूलमधील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. दत्ता यांच्या राजीनाम्याकडे याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

दत्ता यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘‘मला वाटते की सध्याच्या परिस्थितीत मी पक्षात राहण्याच्या पात्रतेयोग्य नाही; पण मी आमदारकीचा राजीनामा देणार नाही.’’ गेल्या काही दिवसांपासून दत्ता यांनी तृणमूलचे निवडणूक धोरणकर्ते प्रशांत किशोर यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचा सूर लावला होता.

भाजप नेते मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये असताना दत्ता हे त्यांचे निष्ठावान समजले जात असत.

तृणमूलचे प्रमुख नेते सुुवेंधू अधिकारी यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ पंडाबेश्वरचे आमदार आणि असनसोल पालिकेतील पक्षनेते जितेंद्र तिवाही यांनीही तृणमूलचा राजीनामा दिला आहे. तृणमूलचे माजी आमदार श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीही पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली आहे.