नवी दिल्ली : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ मदत योजनेच्या पाचव्या टप्प्यात चाळीस हजार कोटींची तरतूद वाढवून दिली आहे. यामुळे टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी अर्थसंकल्पात सीतारामन यांनी मनरेगासाठी ६१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. रविवारी सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या मदत योजनेचा पाचवा व अखेरचा टप्पा जाहीर केला. त्यात मनरेगाची तरतूद वाढवण्यात आली. सरकारने मनरेगाची तरतूद वाढवून दिल्याने दिवसाला ३०० कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्माण होतील, अशी आशा सीतारामन यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात देशाला स्वयंपूर्ण करण्याची घोषणा करतानाच करोनाचा सामना करण्यासाठी वीस लाख कोटींची योजना जाहीर केली होती. सीतारामन यांनी शुक्रवारी कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा कृषी पायाभूत निधी जाहीर केला होता तर सूक्ष्म अन्न उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद केली होती.

मनरेगात काम करणारे अनेक मजूर आता त्यांच्या गावी निघून गेले आहेत, असे असले तरी ते आहेत तेथे मनरेगाच्या कामात त्यांना सहभागी होता येईल. फक्त त्यांची मनरेगात नोंदणी असणे गरजेचे आहे. मोसमी पाऊस तोंडावर असताना परत गेलेल्या मजुरांसह या योजनेत काम करणाऱ्या सर्वानाच याचा लाभ होणार आहे. यातून जलसंधारणाची कामे केली जाणार असून त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला उत्तेजन मिळेल.

जिओजिक फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे गुंतवणूक सल्लागार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, मनरेगाची तरतूद ४० हजार कोटींनी वाढवण्यात आली आहे. शिवाय राज्यांची कर्जमर्यादा वाढवली असून यामुळे बाजारपेठेवर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.

रोजंदारीचा दर १८२ वरून २०२ रुपये

शिव नाडर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख पार्थ चटर्जी यांनी सांगितले की, २०२० च्या अर्थसंकल्पात मनरेगासाठी ६१,५०० कोटींची तरतूद केली होती. गेल्या वर्षीचा मनरेगावरील प्रत्यक्षातील खर्च ७१ हजार कोटी रुपये होता. या वर्षी या योजनेची तरतूद कमी केली होती. आता ती ४० हजार कोटींनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण ४२ टक्के तरतूद केली असून ती गत आर्थिक वर्षांपेक्षा अधिक आहे. मनरेगा रोजंदारीचा दर दिवसाला १८२ वरून २०२ रुपये करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून या वर्षी दर दिवसागणिक मनुष्य रोजगारात २८ टक्के वाढ होणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे की, मे महिन्यात गतवर्षीपेक्षा मनरेगात ४० ते ५० टक्के नोंदणी अधिक झाली आहे.