दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या अधिकृत निवासस्थानी फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचे नियोजन सुरू असल्याचे ऐकले, त्याबाबत कळावे म्हणून फोन केल्याचे सांगितले.

या फोन संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून, फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. विकासपुरी परिसरातून एका अज्ञात व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती असून त्याच्या फोनचा कॉलर आयडी बंद असल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर समजलेला नाही.

दरम्यान, अशाप्रकारची धमकी केजरीवालांना पहिल्यांदाच मिळालेली नाहीये. यापूर्वी अनेकदा त्यांना धमक्या मिळाल्यात, तसंच त्यांच्यावर हल्ले देखील झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हर्षिता केजरीवालच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी विकास नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.