पांढरकवड्यातील ‘अवनी’ (टी-१) या पाच वर्षांच्या वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजताना दिसत आहे. असे असतानाचा आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमध्ये गावकऱ्यांनीच वाघिणीवर हल्ला करुन तिला ठार केले आहे. गावकऱ्यांनी वाघिणीवर हल्ला करुन बेशुद्ध अवस्थेतील वाघिणीवर ट्रॅक्टर चढवून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लखीमपूर दुधवा येथील व्यघ्र अभयारण्याचा भाग असणाऱ्या किशूनपूरच्या जंगलामधील गावकऱ्यांनी एका वाघिणीला लाठ्यांनी हल्ला करुन ठार केले आहे. संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघिणीवर ट्रॅक्टर चढवला. पीलीभीत जिल्ह्यातील चलतुआ गावातील देवानंद नावाची व्यक्ती सायकलवरून आपल्या गावी जात असताना या वाघिणीने त्याच्यावर हल्ला केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देवानंद यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघिणीवर हल्ला करुन तिचा जीव घेतला.

दुधवा येथील व्यघ्र अभयारण्याजवळील चलतुवा गावात राहणारे देवानंद आणि त्यांची पत्नी जंगलामधील रसत्यावरून सायकलने जात होते. त्यावेळी लपून बसलेल्या वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. ते पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरड सुरु केला. त्यानंतर तेथे काही लोक गोळा झाले त्यांनी वाघिणीला हकलवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघिणीने देवानंद यांना काही फुटांपर्यंत फरपटत नेले. त्यानंतर तेथील लोकांची संख्या वाढल्याने घाबरलेल्या वाघिणीने देवानंद यांना आपल्या जबड्यातून सोडून देत पळ काढला.

त्यानंतर तेथील काही लोकांनी लगेचच देवानंदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र तेथे पोहचताच देवानंदचा मृत्यू झाला. दुसरीकडे या हल्ल्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघिणीला घेरले आणि तिच्यावर काठ्या लाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील वाघिणीवर ट्रॅक्टरही चालवला. त्यातच त्या वाघिणीचा मृत्यू झाला. दुधवा हे व्यघ्र अभयारण्य घोषित झाल्यानंतर १० वाघांचा अकाली मृत्यू झाला आहे. अभिनेता रणदीप हुड्डाने गावकऱ्यांनी जीव घेतलेल्या वाघिणीच्या मृतदेहाचा फोटो ट्विट केला आहे.

वाघिणीला गावकऱ्यांनी हल्ला करुन मारल्याचे समजताच दुधवा राष्ट्रीय उद्यानाचे उपनिदेशक महावीर कौलदगी आणि इतर वन अधिकारी घटना स्थळी पोहचले. या वाघिणीला लाठ्यांनी हल्ला करुन ठार केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या वाघिणीचा जीव घेणाऱ्या गावकऱ्यांविरोधात वन्यजीव अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. तर गावकऱ्यांनी या परिसरात आम्ही वाघिणीचा वावर असल्याने आमच्या जीवाला धोका होता. यासंदर्भात आम्ही वारंवार वनविभागाकडे तक्रार केली होती मात्र त्यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

‘अवनी’ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टिका होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर अवनी प्रकऱणावरून निशाणा साधला. ‘देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते’, हा महात्मा गांधींचा सुविचार ट्विटर करत त्यांनी सरकारला फटकारलं आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात अवनी वाघिणीला ठार केल्याने वाद सुरु झाला असतनाचा मध्यप्रदेशातील या प्रकऱणामुळे देशातील वाघांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.