विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांच्यावर एक मोठी सर्जरी केली जाणार आहे. त्याचमुळे त्यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. अनुष्का शंकर यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना नेमकं काय झालं आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत अनुष्का शंकर यांनी त्यांचे सतारवादनाचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.

अनुष्का शंकर यांनी काय म्हटलं आहे?
माझ्या प्रिय मित्रांनो, माझी प्रकृती चांगली नसल्याने मी माझे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करते आहे. हा निर्णय मी अत्यंत जड अंतःकरणाने घेतला आहे. मला हा निर्णय घेताना मुळीच आनंद झालेला नाही. मात्र प्रकृती साथ देईल असं वाटत नसल्याने मी सध्या आराम करते आहे आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवते आहे. येत्या काही दिवसात एक मोठी शस्त्रक्रिया माझ्यावर होणार आहे. त्यासाठी मी मनाची तयारीही करते आहे. मला खात्री आहे की मला तुम्ही सगळेजण समजून घ्याल.

या आशयाचं ट्विट अनुष्का शंकर यांनी केलं आहे. तसंच आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कुठे कुठे होणारे कार्यक्रम रद्द केले आहेत त्याचीही यादी दिली आहे. मात्र आजार कोणता झाला आहे, जी शस्त्रक्रिया केली जाणार आहे ती का केली जाणार आहे? हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

अनुष्का शंकर या जागतिक किर्तीच्या सतारवादक आहेत. भारतीय सतारवादक पंडित रविशंकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून वडील पंडित रविशंकर यांच्याकडून सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा पहिला कार्यक्रम केला.त्यांच्या राईज या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.