श्रीनगर : अल कायदाचाच भाग बनलेल्या ‘अन्सार गझवट उल हिंद’ या संघटनेचे काश्मीरमधील अस्तित्व संपुष्टात आणले असल्याचा दावा जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी बुधवारी केला. अन्सार गझवट उल हिंद  या संघटनेचा प्रमुख असलेला दहशतवादी हमीद लोन व इतर दोन दहशतवादी मारले गेल्यानंतर या संघटनेचे अस्तित्वच संपले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोन ऊर्फ हमीद लेलहारी हा या संघटनेचा काश्मीरमधील संस्थापक झाकीर मुसा याचा उत्तराधिकारी होता. अन्सार गझवट उल हिंद ही संघटना अल कायदाशी एकनिष्ठ आहे. मुसा हा या वर्षी मे महिन्यात झालेल्या चकमकीत मारला गेला होता.

दक्षिण काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्य़ात त्राल येथे मंगळवारी तीन दहशतवादी मारले गेल्यानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. लोन याच्याशिवाय मंगळवारच्या चकमकीत नावीद अहमद टाक व जुनैद रशीद भट हे इतर दोन दहशतवादी मारले गेले होते. मारले गेलेले सर्व दहशतवादी हे पोलिसात गुन्ह्य़ांची नोंद असलेले झाकीर मुसा गटाचे सदस्य होते. दहशतवादी हल्ल्यांच्या अनेक गुन्ह्य़ात ते हवे होते. सुरक्षा आस्थापने व नागरिकांवर त्यांनी हल्ले केले होते. दहशतवाद विरोधी मोहिमेत अन्सार गझवट उल हिंद या संघटनेला मोठा हादरा बसला आहे. पाकिस्तानातील जैश ए महंमद ही संघटना इतर स्थानिक दहशतवादी गटांशी समन्वय ठेवण्याच्या तयारीत असताना हे यश मिळाले आहे. अन्सार गझवट उल हिंद या संघटनेचे अस्तित्व  संपल्यात जमा आहे, पण त्यांचे काही सहकारी घटक हे अजून कार्यरत असू शकतात. जैश ए महंमद व लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने नेमके कुणाला ल क्ष्य करायचे, कशा प्रकाराचा हिंसाचार करायचा याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे ते स्थानिक गटांशी समन्वय साधत आहेत. एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अन्सार गझवट उल हिंद या संघटनेचा संपर्क जैश ए महंमदशी असल्याचे सूचित होत आहे.  पण ठामपणे तसे म्हणता येणार नाही. ५ ऑगस्टपासून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून त्यांची संख्या नेमकी सांगता येणार नाही पण त्यांची संख्या लक्षणीय आहे. उत्तर व दक्षिण काश्मीरमध्ये हे दहशतवादी आले आहेत. काही दहशतवादी घुसण्यात यशस्वी झाले असले तरी घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणूनही पाडले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कर व आयएसआय हे प्रत्यक्ष ताबा रेषेवर दहशतवादी घुसवण्याचे काम करीत आहेत. शस्त्रसंधी झाली की, त्याचा फायदा घेऊन दहशतवादी घुसवले जातात.

अनेक युवकांना काश्मीरमध्ये ताब्यात घेतल्याचे एका प्रतिष्ठित माध्यमाने दिलेले वृत्त निराधार आहे. ज्या युवकांना ताब्यात घेतले होते त्यांना समुपदेशन करून सोडून देण्यात आले. लोकांना कोठडीत ठेवण्याची आम्हाला आवड नाही. जे लोक पकडले त्यात दर चार पैकी तिघांना सोडून देण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काहींना ताब्यात घेण्यात आले असे त्यांनी स्पष्ट केले.

हिज्बुलच्या २ कार्यकर्त्यांना अटक

जम्मू : हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा उच्चपदस्थ दहशतवादी जहांगीर सरूरी याच्या भावासह या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना (ओव्हरग्राऊंड वर्कर्स) पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्य़ात अटक केली. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांच्याविरुद्ध राज्यात सध्या सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून पोलिसांनी किश्तवार टेकडय़ांवरील एका ठिकाणावर छापा घातला आणि मंगळवारी रात्री या दोघांना अटक केली. यापैकी अब्दुल करीन हा हिज्बुलचा प्रमुख दहशतवादी अमीन भट उर्फ जहांगीर सरूरी याचा भाऊ असून, दुसऱ्याचे नाव दानिश नसीर असे आहे. या मोहिमेत १२ दहशतवादी व त्यांचे समर्थक यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

काश्मीरमधील सामान्य जनजीवन विस्कळीतच

श्रीनगर : काश्मीरमधील सामान्य जनजीवन बुधवारी सलग ८०व्या दिवशी विस्कळीत होते. प्रमुख बाजारपेठा बंद होत्या आणि सार्वजनिक वाहतुकीतील वाहनेही रस्त्यांवर धावली नाहीत. शहरातील व्यावसायिक केंद्र असलेल्या लाल चौकासह काही भागांमध्ये सकाळी काही दुकाने काही तासांसाठी उघडली, मात्र ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी शटर बंद केले. मुख्य बाजारपेठा व इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदच होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासगी वाहतूक सुरू होती आणि रस्त्यांवरील वाहनांची संख्या रविवारपेक्षा जास्त होती. त्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली. तथापि, सार्वजनिक वाहतुकीची इतर साधने रस्त्यांवर धावली नाहीत, असे हे अधिकारी म्हणाले. काश्मीर खोऱ्यात लँडलाइन व पोस्टपेड मोबाइल दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आल्या असल्या, तरी ५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या इंटरनेट सेवा अद्यापही बंदच आहेत.

शाळा व महाविद्यालये खुली असली, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या काळजीपोटी पालक त्यांना घरीच ठेवत असल्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी दिसत नाहीत.