दहा दिवसांत तीन अधिकाऱ्यांची हकालपट्टी

व्हाइट हाऊसचे नवनियुक्त संपर्क संचालक अँथनी स्कारामुसी यांना नेमणुकीनंतर अवघ्या दहा दिवसांत अध्यक्ष ट्रम्प यांनी काढून टाकले आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनात किती गोंधळ माजला आहे याचे दर्शन घडले आहे.

स्कारामुसी (वय ५३) यांना दहा दिवसांपूर्वी व्हाइट हाऊसचे संपर्क संचालक म्हणून नेमण्यात आले होते. ते थेट अध्यक्षांना जबाबदार होते व व्हाइट हाऊसच्या काही सहकाऱ्यांबाबत त्यांनी असंसदीय भाषा वापरल्याने ते चर्चेत होते. गेल्या आठवडय़ात त्यांनी व्हाइट हाऊसमधील काम करणाऱ्या लोकांना माहिती बाहेर फुटल्यास तुम्हाला सगळ्यांना घरचा रस्ता दाखवीन अशी अरेरावीची भाषा केली होती. अध्यक्ष ट्रम्प यांनाही स्कारामुसी यांचे हे वक्तव्य योग्य वाटले नाही, असे व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले.

स्कारामुसी यांची हकालपट्टी होण्याच्या काही तास आधी व्हाइट हाऊसचे नवे चिफ ऑफ स्टाफर रिन्स प्रिबस यांना ट्रम्प यांनी पदावरून काढून त्यांच्या जागी निवृत्त नौदल अधिकारी जॉन केली यांची नेमणूक केली होती. व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांमध्ये लाथाळ्या सुरू असून त्या रोज चव्हाटय़ावर येत आहेत. गेल्या दहा दिवसात ट्रम्प यांनी किमान तीन अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले; त्यात प्रसिद्धी सचिव शॉन स्पायसर यांचा समावेश आहे, त्यानंतर प्रिबस व आता स्कारामुसी यांची हकालपट्टी झाली आहे.

व्हाइट हाऊसमध्ये मी गोंधळ खपवून घेणार नाही, असे ट्रम्प यांनी ट्विटरमधील संदेशात म्हटले होते. ट्रम्प यांनी आता केली यांना पूर्ण अधिकार दिले असून ते व्हाइट हाऊसचा अंतर्गत कारभार पाहणार आहेत.