सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (सीएए) भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिले. राहुल गांधी यांनी हा कायदा पूर्णपणे वाचावा, असा सल्लाही शहा यांनी दिला आहे.

‘सीएए’विरोधात असलेल्यांना दलित-विरोधी असल्याचे संबोधून शहा म्हणाले की, मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेतले जाईल असा कोणतेही कलम या कायद्यामध्ये नाही. राहुल गांधी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

राहुल यांनी सीएए पूर्णपणे वाचावा, भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेण्याबाबत त्यामध्ये काही आढळले तर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी त्याबाबत आपल्याशी  वादविवाद करण्यास तयार आहेत, असेही शहा म्हणाले.

भाजपच्या जनजागरण अभियानातील जाहीर सभेत शहा यांनी, काँग्रेस धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा, आरोप केला.

‘एनआरसी’चा फज्जा: चिदंबरम यांची टीका

कोलकाता : आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) फज्जा उडाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तातडीने आपला मोर्चा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीकडे (एनपीआर) वळविल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी येथे केली.एनपीआर हे दुसरेतिसरे काही नसून एनआरसीच आहे, असे चिदम्बरम यांनी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनपीआरच्या भयंकर उद्देशाविरोधात लढा देणे हा आमचा हेतू आहे, असेही चिदम्बरम म्हणाले.

माकपच्या मुखपत्रातून केरळ राज्यपालांवर टीका

तिरुअनंतपूरम : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राज्यातील डावे सरकार यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले आहे. राजकीय वक्तव्ये केल्याबद्दल आणि अत्यंत कडक शब्दांत राज्याला धमकी दिल्याबद्दल माकपचे मुखपत्र असलेल्या ‘देशाभिमानी’मधून खान यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. आपण कोणत्या पदावर आहोत याचे भान न ठेवता राज्यपालांनी येथे आणि दिल्लीत माध्यमांशी चर्चा करताना राजकीय भाष्य केल्याची टीका ‘देशाभिमानी’च्या संपादकीयात करण्यात आली आहे. ‘गव्हर्नर्स पॉलिटिकल गेम’ या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध झाला आहे.

आंदोलनात सहभागी जर्मन विद्यार्थ्यांला भारतात न परतण्याचा सल्ला

रितिका चोप्रा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल जर्मनमधील जेकब लिण्डेन्थल या आयआयटी-मद्रासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला गेल्या महिन्यात देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला सध्या त्याच्याकडे असलेल्या व्हिसाद्वारे पुन्हा भारतामध्ये प्रवेश न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डेसडन येथून द संडे एक्स्प्रेसला लिण्डेन्थल याने सांगितले की, आयआयटी-मद्रास येथून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आपली इच्छा आहे. मात्र जर्मनीतील भारतीय दूतावासाने सध्या असलेल्या व्हिसाचा वापर भारतात परतण्यासाठी न करण्याचा सल्ला दिला आहे.

त्याच्या व्हिसाची मुदत २७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. द संडे एक्स्प्रेसने या बाबत जर्मनीतील भारतीय दूतावासाला ई-मेलद्वारे काही प्रश्न विचारले होते, मात्र त्यांच्याकडून याबाबत प्रतिसाद मिळालेला नाही.

भीम आर्मीप्रमुखांचे दिल्लीत कार्यालय आहे का, याची खातरजमा करा- न्यायालय

नवी दिल्ली : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे दिल्लीत कार्यालय आहे का आणि तेथे ते साप्ताहिक बैठका घेतात का, याची खातरजमा करावी असा आदेश दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी दिल्ली पोलिसांना दिला. जामा मशिदीबाहेर २० डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) निदर्शने करण्यात आली त्यावेळी आझाद यांनी जनतेला चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दर्यागंज येथील हिंसक निदर्शनांप्रकरणी आझाद यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र दिल्ली विधानसभेची निवडणूक असल्याने आझाद यांनी चार आठवडे दिल्लीत येऊ नये आणि कोणतेही धरणे धरू नये, असे र्निबध न्यायालयाने त्यांच्यावर घातले आहेत.

दिल्लीतील आझाद यांचे कार्यालय हे राजकीय पक्षाचे कार्यालय आहे का, याची निवडणूक आयोगाकडून खातरजमा करावी आणि त्याबाबतचा अहवाल २१ जानेवारीपर्यंत सादर करावा, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती कामिनी लऊ यांनी पोलिसांना दिला आहे.