संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) बुधवारी चीनला मोठा झटका लागला. चीनच्या एका प्रस्तावावर आक्षेप घेत अमेरिकेनं अखेरच्या क्षणी ते थांबवलं. खरं तर, चीनने सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारताविरूद्ध खेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चीनच्या प्रस्तावावर अमेरिका आणि जर्मनीनं आक्षेप घेतल्यानं चीनला मोठा झटका लागला आहे.

चीनच्या या प्रस्तावावर आक्षेप घेणारा अमेरिका हा दुसरा देश होता. यापूर्वी मंगळवारी जर्मनीने हा प्रस्ताव प्रसिद्ध होण्याच्या काही मिनिटांपूर्वी यावर आक्षेप घेत ते थांबवले होते. दोन्ही देशांनी उचललेलं हे पाऊल भारतासोबत संबंध अधिक दृढ असल्याचं प्रतीक असल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी सोमवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्लाचा जबाबदार भारत असल्याचा आरोप केला होता.

या हल्ल्यात ठार झालेल्यांसाठी शोक व्यक्त करतांना चीनने पाकिस्तानशी असलेले दृढ संबंध व्यक्त करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. चीनने मंगळवारी हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सादर केला. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार यावर न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणत्याही सदस्यानं यावर आक्षेप घेतला नसता तर ते संमत झाल्याचं समजलं जातं. यासाठी ‘सायलेंस प्रोसिजर’च्या रूपात हा प्रस्ताव सादर करण्यात आलं.

परंतु जर्मनीनं मंगळावारी संध्याकाळी ४ च्या सुमारासच यावर आक्षेप घेतला. “पाकिस्तानातील हल्ल्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला जबाबदार धरलं आहे. परंतु ते स्वीकारता येणार नाही,” असं मत यूएनमधील जर्मनीच्या राजदूतांनी व्यक्त केलं. दरम्यान, चीननंदेखील यावर आक्षेप घेत अंतिम मुदत संपल्याचं म्हटलं. परंतु या प्रस्तावावरील अंतिम मुदत वाढवून १ जुलै सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात आली होती.