इस्लामाबाद : काश्मीरमध्ये भारतीय अधिकारी मानवी हक्कांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करणारी कागदपत्रे (दस्तावेज) पाकिस्तानने रविवारी जारी केली आहेत. परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ व मानवी हक्क मंत्री शिरीन मझारी यांच्यासमवेत १३१ पानांची कागदपत्रे जारी केली. त्यासाठी इस्लामाबाद येथे खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांनी सांगितले, की भारत सरकारचा खरा चेहरा व भूमिका उघड करण्यासाठी भूमिका पार पाडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. जगातील मोठी लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या देशातील एका भागात मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.

भारताने पाकिस्तानला नेहमीच असे निक्षून सांगितले आहे, की जम्मू काश्मीर हा भारताचा एकात्म भाग आहे.

पाकिस्तानने वास्तव स्वीकारले पाहिजे तसेच भारतविरोधी प्रचार थांबवला पाहिजे असेही भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. जम्मू काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे अनेकदा  स्पष्ट करण्यात आले आहे. कुरेशी यांनी सांगितले,की आम्ही आंतरराष्ट्रीय २६ प्रसारमाध्यमांसह भारताचे ४१ व पाकिस्तानच्या १४ जणांसमक्ष ही ११३ पानी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांनी सांगितले,की आम्ही संयुक्त राष्ट्रांना युद्ध गुन्ह्यात सामील असलेल्या गटांची व व्यक्तींची नावे नोंद करून त्यांच्याविरोधात निर्बंध लागू करण्याचे आवाहन करीत आहोत. भारत काश्मीरमध्ये रासायनिक युद्धही खेळत असून रासायनिक अस्त्रे जाहीरनाम्याचे हे उल्लंघन आहे. त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे.