भारताची  लिपुलेख, कालापानी, लिम्पियाधुरा ही ठिकाणे राजकीय नकाशात दाखवून त्यावर ताबा सांगितल्यानंतर आता नेपाळने सीमेवर ते भाग त्यांचेच असल्याचा डांगोरा पिटणे सुरू केले आहे.

नेपाळच्या एफएम रेडिओ वाहिन्या सीमा भागात भारतविरोधी प्रचार करीत आहेत, अशी माहिती धार्चुला उपक्षेत्रातील दांतू खेडय़ाचे रहिवासी शालू दाताल यांनी दिली. हे कार्यक्रम धार्चुला, बालूकोट, जौलजिबी, कालिका या भारतीय सीमेतील गावांपर्यंत ऐकता येतात.

पिठोरगडच्या पोलीस अधीक्षक प्रीती प्रियदर्शिनी यांनी सांगितले की, नेपाळकडून एफएम वाहिन्यांवरून भारतविरोधी प्रचार सुरू असल्याची माहिती गुप्तचरांकडून आलेली नाही. व्यास खोऱ्यातील नेते अशोक नाबियाल यांनी सांगितले की, भारतीय गुप्तचर यंत्रणा सीमेवर कार्यरत असून त्यांनी नेपाळच्या भारतविरोधी प्रचाराची दखल घेतलेली नाही.