दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त घोषणेमुळे कालच त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मात्र, दुसरीकडे कर्नाटक सरकारमधील मंत्री सीटी रवी यांनी अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचे समर्थन करत, देशद्रोहींना बिर्याणी नाही, गोळ्या घातल्या पाहिजेत असे म्हटले आहे. त्यांनी अशाप्रकाचे ट्विट केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सीटी रवी म्हणाले, मी अनुराग ठाकूर यांच्याबरोबर आहे. त्यांनी हॅशटॅग वापरत ट्विट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, देशद्रोहींविरोधातील वक्तव्याबद्दल अनुराग ठाकूर यांच्यावर टीका करणारे हे तेच लोक आहेत, ज्यांनी दहशतवादी अजमल कसाब आणि याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. तुकडे तुकडे गँगच्या पाठिंब्यावर ‘सीएए’बद्दल देशात खोटं पसरवलं जात आहे. देशद्रोहींना बिर्याणी नाही, गोळ्या घातल्या पाहिजेत.

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अनुराग ठाकूर व भाजपा खासदार प्रवेश वर्मा यांच्याकडून आचार संहितेचा भंग झाल्याप्रकरणी अहवाल सादर केला. यानंतर या दोघांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांना खुलासा करण्याची मुदत देण्यात आली आहे.