१९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी तीन जणांना दिल्लीच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींना लक्ष्य ठरवून त्यांना ठार मारण्याचे कृत्य अत्यंत निर्घृण आणि क्रूर असल्याचे मत न्यायालयाने निकालपत्रात नोंदविले आहे.
माजी नगरसेवक बलवान खोक्कर, गिरीधारी लाल आणि नौदलाचे निवृत्त अधिकारी भागमल या तिघांना हत्या आणि दंगलीप्रकरणी जिल्हा न्यायाधीश जे.आर. आर्यन यांनी ही शिक्षा ठोठावली. याच खटल्यात काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना न्यायालयाने ३० एप्रिल रोजी दोषमुक्त केले असून या निकालास सीबीआयकडून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे समजते.