हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली असली तरी त्यांच्यासमोरील आव्हाने संपलेली नाहीत. ट्रम्प यांच्या निषेधार्थ अमेरिकेत सर्वत्र मोर्चाचे आयोजन केले जात असून ट्रम्प हे आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत अशी घोषणा देत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. मात्र ट्रम्प यांचा विजय अमेरिकेतील नागरिकांना फारसा रुचलेला नाही. बोस्टनपासून ते लॉस एंजेलिसपर्यंत हजारो जण रस्त्यावर उतरून ट्रम्प यांचा विरोध दर्शवत आहे. या सर्वांना ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपलेसे वाटत नाही. विशेषतः डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांच्या निषेधार्थ आयोजित रॅलीत पाच हजार जण सहभागी झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व मोर्चे शांततेत पार पडल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. या मोर्चामध्ये विद्यार्थी, तरुण आणि महिला वर्गाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते. ‘आम्हाला आमच्या नागरी हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागते यावर विश्वास बसत नाही’ अशी प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थ्याने दिली आहे.

ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कट्टरतावादी विचारधारा, महिलाविरोधी वक्तव्य, मुस्लिम आणि स्थलांतरितांना विरोध असे विविध मुद्दे मांडले होते. ट्रम्प यांच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली असलती मतदारांनी ट्रम्प यांनाच निवडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीचा निकाल बघून मला धक्काच बसला. ट्रम्प हे अनेकांना तुरुंगात धाडतील अशी भीती वाटत असल्याचे एका आंदोलकाने नमूद केले. एक देश म्हणून आम्हाला पुढे जायचे होते. पण आम्ही पुढे जाण्याऐवजी मागे पावले टाकत आहोत. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन देश पुढे जाईल हे निश्चित केले पाहिजे अशी प्रतिक्रिया एका महिला आंदोलकाने दिली आहे. आम्ही भीतीच्या सावटाखाली जगणार नाही. लढा देण्यासाठी उभे राहा अशी घोषणाबाजीही आंदोलक करत आहेत. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होताच अमेरिकेत काम करणा-या परदेशी तरुणांना पुन्हा मायदेशी पाठवतील अशी भीतीही अनेकांना वाटत आहे. ऑस्टिनमध्ये विद्यार्थ्यांनीही ट्रम्प यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातून बाहेर पडत ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. काही विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान झेंडेही जाळल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. लॉस एंजेलिसमध्ये राहणा-या ब्रुकलिन व्हाईट या १८ वर्षाच्या तरुणाने हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला होता. पण ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यालाही धक्का बसला. द्वेषाचा कधीच विजय होऊ शकत नाही अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिली.