भारतात कोट्यावधींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी मोहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. आता त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रं डोमिनिकाला पाठवली गेली आहेत. भारतातून फरार झाल्यानंतर २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता. या पार्श्वभूमीवर आता अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे.

मेहुल चोक्सी कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर डोमिनिकामध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि तिथे त्याला अटक करण्यात आली. असं अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन म्हणाले असल्याचं अँटिग्वा न्यूज रूमच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिलं आहे.

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु?; भारतीय विमान डोमिनिकात दाखल

तसेच, भारताचं खासगी विमान डोमिनाकमध्ये २८ मे रोजी दाखल झाल्याच्या वृत्ताला अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. “माझ्या माहितीप्रमाणे भारत सरकारने मेहुल चोक्सी फरार असल्याचं सिद्ध करण्यासाठी तेथील कोर्टामधील कागदपत्रं पाठवली असून ही कागदपत्रं येथील पुढील सुनावणीत वापरण्यात येणार आहेत,” अशी माहिती अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी अँटिग्वा न्यूज रुमशी बोलताना दिली आहे.