18 July 2018

News Flash

अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला

साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी खेर यांच्यासह १८ भारतीयांना निमंत्रित केले आहे.

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानकडून व्हिसा नाकारण्यात आला आहे. कराची येथे ५ फेब्रुवारीला होणाऱया साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी अनुपम खेर यांनी पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र, तो नाकारण्यात आल्याने अनुपम खेर साहित्य संमेलनात उपस्थित राहू शकणार नाहीत. महत्त्वाची बाब अशी की, कराची येथील साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी खेर यांच्यासह १८ भारतीयांना निमंत्रित केले आहे. त्यातील फक्त अनुपम खेर यांनाच व्हिसा नाकारण्यात आला आहे. उर्वरित १७ जणांना व्हिसा देण्यात आला आहे. चार दिवसांच्या या साहित्य संमेलनात अनुपम खेर दोन सत्रांना उपस्थित राहणार होते. व्हिसा नाकारण्यात आल्याच्या वृत्ताला खुद्द खेर यांनीही दुजोरा दिला असून, घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
भारतात पाकिस्तानी कलाकारांना दुजाभाव दिला जातो असे नाही. त्यांचे येथे स्वागतच केले जाते. भारतात एखाद्या ठिकाणी पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला विरोध केला जात असला तरी देशात इतर ठिकाणी मात्र त्यांचे स्वागत केले जाते. पण पाकिस्तानात मात्र भारतीय कलाकारांना अपेक्षित वागणूक दिली जात नाही, असेही खेर यावेळी म्हणाले.

First Published on February 2, 2016 2:38 pm

Web Title: anupam kher denied visa to attend karachi literature festival in pakistan