एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायदा आणि निर्वासितांसाठी छावणी उभारण्याच्या विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका सभेतून उत्तर दिलं होतं. एनआरसी आणि सीएए वरून विरोधक अफवा पसरवून भीती निर्माण करण्याच काम करत असल्याचं मोदी म्हणाले होते. मोदींच्या आरोपांवर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने हिटलरच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे.

देशभर ‘एनआरसी’ राबवणारच असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत आणि झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या सभेत मात्र ‘एनआरसी’बाबत संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केवळ आसाममध्ये ‘एनआरसी’ राबवण्यात आली, असा दावा मोदींनी केला होता.

मोदी यांच्या सभेतील विधानानंतर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं मोदी यांच्यावर टीका केली आहे. अनुरागनं हिटलरच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मला माहिती आहे की माझा द्वेष कोण करतं. तुमची ईच्छा असेल तर खुशाल माझा तिरस्कार करा. पण, जर्मनीचा तिरस्कार करू नका,” असं आवाहन हिटलर करत आहे. इतकाच संवाद असलेला व्हिडीओ टाकून “माझा द्वेष करा, पण भारताचा द्वेष करू नका, आपले बिचारे पंतप्रधान,” असं म्हणत अनुरागनं शहरी नाझी असा हॅशटॅगही वापरला आहे.

आणखी वाचा – मोदी सरकारवर टीका करणे अनुराग कश्यपला पडले महागात ?

मोदी काय म्हणाले होते?

‘एनआरसी’विषयी असत्य माहिती पसरवण्यात येत असल्याचे भाष्य करत, मुळात ही कल्पना आधीच्या काँग्रेस सरकारचीच आहे, असं मोदी म्हणाले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बद्दल भारतीय मुस्लिमांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. माझे विरोधक मला लक्ष्य करण्यासाठी लोकांना भडकावून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांना स्थानबद्धता छावण्यांमध्ये (डिटेन्शन सेंटर्स) पाठवण्यात येईल, अशी अफवा काँग्रेस, काँग्रेसचे मित्रपक्ष आणि शहरी नक्षलवादी पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. त्याचबरोबर गरिबांच्या रिक्षा जाळू नका तर माझे पुतळे जाळा असंही मोदी या सभेत म्हणाले होते.