नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे. या संपूर्ण प्रकरणावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने संताप व्यक्त केला आहे. त्याने सरकारला ‘फासिस्ट’ म्हणत ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

‘हे संपूर्ण प्रकरण खूप पुढे गेलं आहे. आता आणखी शांत बसू शकणार नाही. हे सरकार ‘फासिस्ट’ आहे. ज्यांचा आवाज खरंच काही बदल घडवू शकतो आणि तेच लोक मौन बाळगत असल्याचा मला जास्त राग येतोय,’ असं अनुरागने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय. ट्विटरच्या माध्यमातून अनुरागने याआधीही अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरुन जामिया विद्यापीठामध्ये झालेल्या हिंचारावर अनेक जण सोशल मीडियाद्वारे व्यक्त झाले आहेत. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीसुद्धा आता आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अशा म्हणत सरकारवर टीका केली.