पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापले पाहिजे, असे वादग्रस्त विधान बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी केले आहे. असंख्य अडथळे पार करुन मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींकडे बोट दाखवणाऱ्यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी भाजप समर्थकांना केले आहे.

बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उजियारपूरमधून लोकसभेत निवडून गेलेले नित्यानंद राय यांनी ओबीसी समाजाच्या मेळाव्यात बोलताना वादग्रस्त विधान केले. नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. ‘मोदींना त्यांची आई ज्या ताटात जेवण वाढायची त्या ताटात दोघांनाही एकमेकांचे चेहरेदेखील दिसायचे नाही. अशा गरीब कुटुंबातून आलेले मोदी आज देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. प्रत्येकाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे आणि प्रत्येकाने त्यांचा आदरही केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे (मोदींकडे) बोट दाखवणाऱ्यांचे आपण सर्वांनी मिळून हात तोडले पाहिजेत किंवा थेट कापले पाहिजेत, असे चिथावणीखोर विधान त्यांनी केले.

राय यांच्या या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने नित्यानंद राय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. देशाची सुरक्षा आणि अभिमानावर संकट आल्यास आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मला म्हणायचे होते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हेदेखील मंचावर उपस्थित होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी राय यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. भाजप अभिमानावर कसे भाष्य करु शकते?, त्यांच्याकडे अभिमानास्पद काहीच नाही, असा चिमटा त्यांनी काढला आहे.