तुम्ही हातात शस्त्र घ्याल, तर तुमचा खात्मा करणारच, अशा शब्दात भारतीय सैन्याने दहशतवादी मार्गाकडे वळणाऱ्या जम्मू- काश्मीरमधील तरुणांना ठणकावले आहे. अनेक गाझी आले आणि गेले, दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान आम्ही ठरवलं आहे. जो काश्मीरमध्ये घुसखोरी करणार, त्याला कंठस्नान घालणारच, असेही सैन्याने म्हटले आहे. अब्दुल गाझी हा पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सैन्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला हा आदिल दार या दहशतवाद्याने केला होता. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असून तो मार्च २०१८ मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. रहिवासी भागातील चकमकी दरम्यान आम्ही स्थानिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करतो. चकमकीदरम्यान नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतो, असे सैन्याने स्पष्ट केले.

अनेक गाझी आले आणि गेले, प्रत्येकाचा खात्मा केला जाणारच, असे सैन्याने सांगितले. आम्ही काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी १४४११ ही हेल्पलाइन सुरु केली आहे. या हेल्पलाइनवर देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. विविध ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असेही सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या हल्ल्यात कोणत्या स्वरुपाचे होते आणि स्थानिकांपैकी कोणाचा हात होता का ?, याची प्राथमिक माहिती आमच्या हाती लागली आहे. मात्र, हा तपासाचा भाग असल्याने अधिक तपशील जाहीर करणार नाही, असे ढिल्लन यांनी सांगितले.