अमेरिकी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा ‘द असोसिएटेड प्रेस’ (एपी) व ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्था तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राचा समावेश आहे. पुरस्कारांचे हे १००वे वर्ष असून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
आग्नेय आशियाई देशांतून अमेरिकी बाजारात येणाऱ्या मासे आणि अन्य सागरी अन्नाच्या व्यापारात मोठय़ा प्रमाणात कामगारांना वेठीला धरले जाते. त्या गैरप्रकारांवर एपीने १० लेखांच्या मालिकेतून प्रकाश टाकला होता. त्यानंतर २००० कामगारांची सुटका होऊन ही यंत्रणा सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. या कार्याबद्दल एपीला पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. आहे.
तर युरोपीय देशांतील निर्वासितांचे प्रश्न छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्याबद्दल रॉयटर्स आणि न्यूयॉर्क टाइम्सला पुरस्कार मिळाला. न्यूयॉर्क टाइम्सला आजवर त्यांच्या पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेबद्दल ११७ पुलित्झर पारितोषिके मिळाली आहेत. यंदा त्यात आणखी दोन पुरस्कारांची भर पडली.
कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकाडांच्या वृत्तांकनासाठी ‘लॉस एंजल्स टाइम्स’ला पुलित्झर पुरस्कार मिळाला.
‘द बोस्टन ग्लोब’, ‘टॅम्पा बे’ आणि ‘द न्यूयॉर्कर’ या नियतकालिकांनाही प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले.