News Flash

कलाम यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी जनसागर

माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव रामेश्वरम या तामिळनाडूतील मूळ गावी खास हेलिकॉप्टरने आणण्यात आले.

| July 30, 2015 01:27 am

माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव रामेश्वरम या तामिळनाडूतील मूळ गावी खास हेलिकॉप्टरने आणण्यात आले. आपल्या भूमीतील लाडक्या सुपुत्राचे दर्शन घेण्यासाठी त्या छोटय़ाशा गावातही जनसागर लोटला होता. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कलाम यांचे पार्थिव घेऊन आलेले हेलिकॉप्टर मंडपम जवळ एका हेलिपॅडवर सायंकाळी चार वाजता उतरले. त्याआधी त्यांचे पार्थिव खास विमानाने मंगळवारी नवी दिल्लीहून मदुराईला आणण्यात आले होते.
नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू व संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर हे कलाम यांचे पार्थिव घेऊन आले. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे मंत्री तेथे उपस्थित होते. त्यांचे पार्थिव तिरंगा ध्वजात गुंडाळून लष्करी वाहनातून १० कि.मी.च्या मार्गावरून नेण्यात आले तेव्हा लोकांनी या भूमीच्या लाडक्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेतले. कलाम यांच्या कुटुंबातील काही सदस्य यावेळी उपस्थित होते. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता व द्रमुक नेते एम. के. स्टालिन यावेळी उपस्थित होते. हेलिकॉप्टर उतरताच लोक वेगाने तिकडे धावले तेव्हा सुरक्षा रक्षकांना त्यांना रोखावे लागले. दरम्यान नायडू यांनी सांगितले की, कलाम यांचे पार्थिव रात्री आठ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल त्यानंतर ते कलाम यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल. नंतर ते पार्थिव पल्लीवसल रस्त्यावरील वडिलोपार्जित घरी नेले जाईल तेथेच कलाम लहानाचे मोठे झाले. तेथे धार्मिक विधी केले जातील. त्यांचे पार्थिव स्थानिक मशिदीतही नेले जाणार आहे. एकूण २००० पोलीस व सुरक्षा जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
केरळमधील तांत्रिक विद्यापीठाला डॉ. कलाम यांचे नाव
थिरुवनंतपूरम : केरळमधील प्रस्तावित तांत्रिक विद्यापीठाला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी बुधवारी राज्य विधानसभेत ही घोषणा केली. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. कलाम यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. एक वैज्ञानिक म्हणून डॉ. कलाम यांचा केरळशी जवळपास २० वर्षे निकटचा संबंध होता, असे चंडी म्हणाले.
त्यामुळे राज्य सरकारने एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 1:27 am

Web Title: apj abdul kalams body flown to rameswaram funeral to be held tomorrow
Next Stories
1 संजीव चतुर्वेदी, अंशू गुप्ता यांना मॅगसेसे पुरस्कार
2 इसिस भारतावर हल्ल्याच्या तयारीत
3 उत्तर प्रदेशात वडिलांकडून मुलीची गोळ्या घालून हत्या
Just Now!
X