नवी दिल्ली :स्पुटनिक व्ही लसीकरणासाठी अपोलो हॉस्पिटल्स व डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज यांच्यात करार झाला असून या लसीकरणाचा पहिला टप्पा हैदराबादेत सोमवारी सुरू झाला तर मंगळवारी (दि.१८) विशाखापट्टनम येथे सुरू होणार आहे. लसीकरण प्रक्रियेत प्रमाणित संचालन प्रक्रियांचा अवलंब करण्यात येणार असून त्यात कोविन या सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

लसीकरणाचा हा पथदर्शक टप्पा असून डॉ. रेड्डीज व अपोलो हॉस्पिटल्स यांनी तयारीचा आढावा घेतला आहे. शीतगृहांसह वाहतूक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. स्पुटनिक लशीच्या मदतीने आम्ही सध्याच्या लसीकरण प्रक्रियेत मोलाची भूमिका पार पाडू असे अपोलो हॉस्पिटल्सचे विभागीय अध्यक्ष के. हरी प्रसाद यांनी सांगितले. खासगी क्षेत्रासाठी आता लसीकरण कार्यक्रम खुला करण्यात आला असून आरोग्य क्षेत्राने लसीकरणाचा वेग वाढवण्याचे ठरवले आहे. अपोलो रुग्णालयांमध्ये सर्व ठिकाणी ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायचे असेल तर ते अपोलो रुग्णालयाच्या मदतीने करू शकतात. देशात अपोलो रुग्णालयांची केंद्रे साठ ठिकाणी असून अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालये व अपोलो क्लिनिक्स येथेही लस उपलब्ध केली जाईल, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही .रमण यांनी सांगितले की, दोन्ही संस्था पथदर्शी प्रकल्पावर एकत्रित काम करणार आहेत. जास्तीत जास्त भारतीयांचे लसीकरण करण्याचा हेतू त्यात आहे. आतापर्यंत स्पुटनिक लशीचे दीड लाख व नंतर दुसऱ्या टप्प्यात साठ हजार डोस आयात करण्यात आले आहेत. हैदराबाद व विशाखापट्टनमनंतर स्पुटनिक लसीकरण कार्यक्रम दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता व पुणे येथे सुरू केला जाईल. ऑगस्ट २०२० मध्ये स्पुटनिक ही करोनावर नोंदणी  केलेली पहिली आंतरराष्ट्रीय लस ठरली.  ती रशियाच्या गमानलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ एपिडेमॉलॉजी अँड मायक्रोबायॉलॉजी या संस्थेने तयार केली असून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने वितरणास उपलब्ध केली आहे.

लसनिर्मितीसाठी शिल्पा मेडिकेअरबरोबर करार

नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीची निर्मिती करण्यासाठी शिल्पा मेडिकेअर  या कंपनीने डॉ. रेड्डीज कंपनीशी करार केला आहे. शिल्पा बायॉलॉजिकल्स प्रा. लि या कंपनीने हा करार तीन वर्षांसाठी केला असून त्यात स्पुटनिक लशीची निर्मिती केली जाणार आहे. कर्नाटकातील धारवाड येथे पायाभूत सुविधा असल्याने तेथे या लशीची निर्मिती केली जाणार आहे. स्पुटनिक लशीचे पहिल्या १२ महिन्यात ५ कोटी डोस तयार केले जाणार असून  व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. शिल्पा मेडिकेअरने म्हटले आहे की, रेड्डीज कंपनीने स्पुटनिकचे तंत्रज्ञान हस्तांतर करण्याची तयारी दर्शवली आहे. डॉ. रेड्डीज कंपनी वितरण व विपणनास जबाबदार असणार आहे. शिल्पा मेडिकेअरच्या मते स्पुटनिक लाइट ही एका मात्रेची लस तयार करण्याचा विचारही केला जात आहे. रेड्डीज लॅबोरेटरीजने शुक्रवारी स्पुटनिक लस आयात केली असून तिचा दुसरा साठ हजार मात्रांचा साठा शुक्रवारी उपलब्ध झाला.

राज्यांकडे दोन कोटी मात्रा

नवी दिल्ली : देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे  कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या २ कोटी मात्रा आता उपलब्ध आहेत, आणखी तीन लाख मात्रा त्यांना पुढील तीन दिवसात देण्यात येणार आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना २०कोटी ७६ लाख १० हजार २३० मात्रा दिल्या असून १६ मे पर्यंत त्यातील १८ कोटी ७१ लाख १३ हजार ७०५ लशी वापरल्या गेल्या आहेत.