गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर बसपाच्या नेत्या मायावती यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सरदार पटेल यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण आदर आहे. मात्र बसपावर स्मारकांसाठी वायफळ खर्च केला म्हणून टीका करणाऱ्या भाजपाने आणि संघाने आता माफी मागावी असे मायावती यांनी म्हटले आहे. बसपाची सत्ता होती तेव्हा दलित आणि मागास नेते, महापुरुष यांच्या स्मारकांसाठी आम्ही वायफळ खर्च करतो आहोत अशी टीका आमच्यावर केली जात होती. आता याच भाजपाने सरदार पटेल यांच्या स्मारकासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. मग त्यांनी बसपाची माफी का मागू नये? असाही प्रश्न मायावतींनी उपस्थित केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार, राहणी हे सगळे भारतीय संस्कृतीला साजेसे होते. असे असतानाही त्यांच्या प्रतिमेला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे इंग्रजी नाव का दिले गेले? यामागे राजकारण आहे का? हे पाहावे लागेल असेही मायावतींनी म्हटले आहे. त्यांची देशातली जी प्रतिमा होती ती भारतीय संस्कृतीच्या आदर्शांना साजेशी होती अशात त्यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव का देण्यात आले? हा प्रश्नही जनतेच्या मनात राहिल असेही मायावतींनी म्हटले आहे.

भाजपाला सरदार पटेल यांच्या नावाचे राजकारण करायचे आहे. मात्र भाजपाचे नेते त्यांच्या आदर्शांवर चालतील का? असाही प्रश्नही मायावतींनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटेल यांच्याबद्दल आदर होता तर त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांचा भव्य पुतळा का उभारला नाही असेही मायावतींनी विचारले आहे.