अॅपलने बरेच दिवस प्रतीक्षा असलेली त्यांची आयटय़ून रेडिओ सेवा सुरू केली आहे. संगीताचा ऑनलाइन रेडिओ आस्वाद देण्यात आघाडीवर असलेल्या पँडोरा व स्पॉटिफाय या ऑपरेटर्सना आव्हान देण्यासाठी अॅपलने ही सेवा सुरू केली आहे. ही मोफत इंटरनेट रेडिओ सेवा असून त्यावर दोनशे केंद्रे लागतात. आयटय़ून स्टोअरच्या कॅटलॉगमधील विविध प्रकारच्या संगीताचा खजिना यामुळे रसिकांना खुला होणार आहे. अॅपलची वार्षिक विकसक परिषद सॅनफ्रान्सिस्को येथे सुरू झाली त्या वेळी ही घोषणा करण्यात आली.
नवे काय?
या वर्षी उत्तरार्धात जाहिरातींचे पाठबळ असलेली मोफत संगीत सेवा सुरू होत आहे. त्यामुळे आठवडय़ाला चक्क हजारो नवीन गाणी ऐकण्याची संधी मिळणार आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांचे वेगळे संगीत तुम्ही दुसरीकडे कुठे ऐकण्यापूर्वी येथे ऐकायला मिळणार आहे. अॅपलच्या पर्सनल व्हॉइस असिस्टंट सॉफ्टवेअर प्रोग्राम सिरीबरोबर ही सेवा एकात्मिक स्वरूपात सादर केली जाणार असून यात तुम्ही अशा आवडलेल्या संगीतासारखे आणखी संगीत ऐकण्याची फर्माईश करू शकता.
विशेष काय?
आयटय़ून रेडिओ हा व्यक्तिगत रेडिओ केंद्रे ऐकण्याचा अविश्वसनीय अशा स्वरूपाचा अनुभव असेल. गाणे कोण म्हणते आहे, कलाकार कोण आहेत याची माहितीही यात कळणार आहे. ही रेडिओ केंद्रे तुमची अभिरुची लक्षात घेऊन केलेली असतील, असे अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष एडी क्यू यांनी सांगितले. हे असे संगीत आहे जे तुम्हाला आवडते, हे असे संगीत आहे जे तुम्हाला आवडू लागते, आयटय़ूनवरून एका क्लिकच्या मदतीने तुम्ही ते खरेदीही करू शकता असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 3:38 am