अॅपलच्या आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस या दोन मोबाईल फोनची सध्या जगभरात चर्चा आहे. ७ ऑक्टोबरपासून हे फोन विक्रीसाठी भारतीय बाजारपेठेतदेखील दाखल झाले आहेत. मात्र, महागड्या किंमतीमुळे सामान्य भारतीय ग्राहक आयफोन ७ पासून अंतरच राखून आहेत. परंतु गुरूवारी एअरटेलकडून आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस अनुक्रमे १९,९९० आणि ३०,७९२ रूपयांना विकण्यात येत आहेत, हे उघड झाले आणि सोशल मिडीयासह सर्वत्रच चर्चेला सुरूवात झाली. एअरटेल इंडियाच्या संकेतस्थळावर अॅपलसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पेजवर ही जाहिरात झळकत होती. मात्र, याबाबतची सत्यता पडतळण्यासाठी अनेकजण एअरटेलच्या संकेतस्थळावर गेले तेव्हा त्यांना ४०४ हा पाहायला मिळत होता. त्यानंतर काहीवेळाने या सगळ्यामागचे सत्य उघड झाले.
आयफोन ७ प्लस….कॅमेरा उद्योगासाठी डोकेदुखी
एअरटेलच्या कस्टमर केअर विभागाने ही योजना केवळ भारतीय एअरटेलच्याच कर्मचाऱ्यांसाठीच असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात ट्विटरसह सोशल मिडीयावर या सगळ्याची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यानंतर आता एअरटेलने यासंबधी निवेदन जाहीर करून सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे एअरटेलची ही ऑफर काही विशिष्ट समुहाच्याच कंपन्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये आयफोन ७ लीज अँड अपग्रेड तत्त्वावर देण्यात येणार आहे. १२ महिने पूर्ण झाल्यानंतर तो आयफोन परत देऊन ग्राहकाला नव्या व्हर्जनचा आयफोन घ्यावा लागणार आहे. मात्र, तोच फोन कायम ठेवायचा झाल्यास ग्राहकाला फोनच्या क्षमतेनुसार २४ हजार ते ३२ हजार इतकी रक्कम भरावी लागेल.
 आयफोन ६ एस झाला २२ हजारांनी स्वस्त