श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्य़ात बुधवारी सायंकाळी झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात पंजाबमधील सफरचंदांचा एक व्यापारी ठार, तर दुसरा जखमी झाला.

त्रेंझ येथे ३-४ दहशतवाद्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चरणजीत सिंह व संजीव यांना गोळ्या घातल्या. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे चरणजीत मरण पावला, तर संजीव याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांत काश्मीर खोऱ्यात घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.

मजुराची हत्या

छत्तीसगडच्या एका स्थलांतरित मजुराची दक्षिण काश्मीरच्या दहशतवादग्रस्त पुलवामा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी बुधवारी गोळ्या घालून हत्या केली.

छत्तीसगडच्या बन्सोली येथील रहिवासी असलेला एस.के. सागर हा वीटभट्टीवर काम करणारा मजूर होता. पुलवामाच्याा काकापोरा भागात दहशतवाद्यांनी त्याला ठार मारल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी आम्ही निरनिराळ्या भागांत पथके रवाना केली आहेत, असे ते म्हणाले.