काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपवली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. आपल्याला या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे वोरा यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेकदा त्यांची मनधारणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु ते आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. त्यानंतर बुधवारी मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे वृत्त समोर आले होते. परंतु वोरा यांनी या वृत्ताचे खंडन करत आपल्याला याबाबात माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आपली पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे, वोरा यांनी एनएनआयशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षासाठी केलेल्या कामांचीही स्तुती केली. राहुल गांधी 25 मे रोजी काँग्रेसच्या कार्यकारिणीकडे आपला राजीनामा सोपवला होता. परंतु कार्यकारिणीने राहुल गांधी हे अध्यक्षपदी राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या प्रचारातही त्यांचा मोठा वाटा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीच राहुल गांधी आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यातही अपयश आले होते. तसेच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरात लवकर निवडावा, असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. दरम्यान, पुढील दिशा ठरवण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस लवकरच एक बैठक आयोजित करणार असल्याचे वोरा म्हणाले.