News Flash

सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती

२४ एप्रिलला शपथविधी

(संग्रहित छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार न्या. रमणा हे देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून २४ एप्रिलला शपथ घेणार आहेत.

सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होत असून ते निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी रमणा यांचा शपथविधी होत आहे. रमणा हे २६ ऑगस्ट २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.

अधिसूचनेत म्हटले आहे की, अनुच्छेद १२४ मधील दुसऱ्या कलमानुसार राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत न्या. नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी २४ एप्रिल २०२१ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा व कायदा मंत्रालयाचे सचिव बरुण मिश्रा यांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र रमणा यांना सकाळी दिले.

रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम येथे २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून ते १० एप्रिल १९८३ रोजी वकिलीच्या क्षेत्रात आले. नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात २७ जानेवारी २०२० रोजी कायम न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळ ते आंध्र उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते. २ सप्टेंबर २०१३ रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. तर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.  रमणा यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली असून अनुच्छेद ३७० च्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या पाच सदस्यांच्या  घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्या वेळी हे प्रकरण सात सदस्यांच्या न्यायपीठाकडे देण्यास घटनापीठाने नकार दिला होता.

याचिका फेटाळल्यानंतर शिफारस

* विद्यमान सरन्यायाधीश बोबडे यांनी अलिकडेच रमणा यांच्या नावाची शिफारस त्यांचे उत्तराधिकारी म्हणून केली होती.

* आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस जगनमोहन रेड्डी यांनी न्या. रमणा यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर रमणा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

* प्रथेप्रमाणे निवृत्तीच्या एक महिना अगोदर विद्यमान सरन्यायाधीश हे पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरकारला करीत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:28 am

Web Title: appointment of ramana as chief justice abn 97
Next Stories
1 राजकीय अस्थैर्यासाठी विरोधकांकडून अपप्रचार
2 दुसऱ्या लाटेत आगामी चार आठवडे कळीचे!
3 २०४७ पर्यंत नवीन भारत निर्माण करू – नायडू
Just Now!
X