‘सीरम’, ‘भारत बायोटेक’च्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीची उद्या पुन्हा बैठक

नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशींच्या आपत्कालीन परवान्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूटबरोबरच ‘भारत बायोटेक’ने केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने बुधवारी पुन्हा प्रलंबित ठेवले. या अर्जाबाबत समितीची शुक्रवार, १ जानेवारीला पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे करोनावरील लशीसाठी भारतीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या करोनावरील लशीला ब्रिटनने बुधवारी मान्यता देताच हीच लस ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने उत्पादित करणाऱ्या ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी भारताच्या नियामकांकडून परवानगीबाबत आशावाद व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिटय़ूटबरोबरच फायझर, भारत बायोटेक या कंपन्यांच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीची बुधवारी दुपारी बैठक सुरू झाल्याने त्याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. मात्र, फायझरने तपशिलासाठी आणखी मुदत मागितली, तर ‘सीरम’ आणि ‘भारत बायोटेक’ने पुन्हा सादर केलेला तपशील आणि आकडेवारीचे समितीने विश्लेषण केले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, १ जानेवारीला समितीची पुन्हा बैठक होणार आहे, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. करोनावरील लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज फायझर कंपनीपाठोपाठ सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांनी केले होते. भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सीन’ नावाची लसनिर्मिती करत आहे.

याआधी ९ डिसेंबरला समितीने अपुऱ्या तपशिलामुळे या कंपन्यांच्या अर्जावर निर्णय घेतला नव्हता. ‘सीरम’ला संपूर्ण तपशील सादर करण्याची सूचना समितीने केली होती. तसेच ‘भारत बायोटेक’ला समितीने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा तपशील सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर बुधवारच्या बैठकीतही लशींच्या परवानगीबाबत निर्णय न झाल्याने भारतीयांना लशींसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता १ जानेवारीला होणाऱ्या समितीच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ब्रिटनची मात्र मान्यता

लंडन : ऑक्सफर्ड – अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या करोनावरील लशीला ब्रिटनने बुधवारी मान्यता दिली. फायझर-बायोएनटेकच्या लशीनंतर ब्रिटनने मान्यता दिलेली ही दुसरी लस आहे. नवा करोना वेगाने फैलावत असताना या लशीच्या वापराचा मार्ग खुला झाल्याने ब्रिटनला मोठा दिलासा मिळाला आहे.

ब्रिटनच्या औषध व वैद्यकीय उत्पादन नियामक संस्थेने (एमएचआरए)ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीचे मूल्यमापन केले आहे. गेल्या आठवडय़ात सरकारने याबाबतची अंतिम आकडेवारी संस्थेकडे सादर केली होती. ‘एमएचआरए’ने लशीच्या वापरास परवानगी दिल्याने ती सुरक्षित आणि परिणामकारक ठरली असून, राष्ट्रीय आरोग्य सेवा विभाग या लशीच्या पहिल्या दोन मात्रा देण्याचा प्राधान्यक्रम ठरवेल, असे ब्रिटन सरकारने म्हटले आहे.

या लशीला वापराची परवानगी मिळाल्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना ही लस देण्याचा प्रयत्न करू, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. या  लशीचे वितरण ४ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरच्या काही आठवडय़ांत लसीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.

ऑक्सफर्ड किंवा फायझर-बायोएनटेकच्या लशीची पहिली मात्रा मिळणाऱ्या व्यक्तीला १२ आठवडय़ांत दुसरी मात्रा देण्यात येईल. सर्वाना लस मिळेल आणि करोनापासून दिर्घकालीन संरक्षणासाठी दुसरी मात्रा आवश्यक असेल, असे ब्रिटन सरकारने म्हटले आहे. ब्रिटनने ‘ऑक्सफर्ड’च्या लशीच्या दहा कोटी कुप्यांची मागणी नोंदवली असून, मार्चअखेपर्यंत ४ कोटी कुप्या सरकारकडे उपलब्ध होणार आहेत.