आर्चबिशपांच्या आवाहनाने नवा वाद

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काऊटो यांनी सर्व चर्चमधील पाद्रींना लिहिलेल्या एका पत्रावरून राजकीय वाद उफाळून आला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुका २०१९ मध्ये होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा निवडून येऊ नये यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन काऊटो यांनी या पत्राद्वारे केले आहे. भाजपने त्याला तीव्र आक्षेप घेतला असून जाती आणि समाजांना भडकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.

भारतीय राजकीय क्षेत्रात अशांतता निर्माण झाली आहे, आगामी निवडणुका लक्षात घेता प्रार्थना आणि उपवास करा, असे आवाहन काऊटो यांनी सर्व चर्चमधील पाद्रींना केले आहे. सध्याचे राजकीय वातावरण हे लोकशाहीतील सिद्धान्त आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेसाठी धोकादायक बनले आहे, २०१९ मध्ये देशात नवे सरकार असेल, त्यासाठी आतापासूनच प्रार्थना करा, असेही पत्रात म्हटले आहे.

आर्चबिशप यांच्या पत्रावर भाजपने आक्षेप घेतला आहे. जातींमध्ये आणि समाजांना भडकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका भाजपने केली आहे. धर्म आणि राजकारणाच्या भिंती तोडून नरेंद्र मोदी विकासाची कामे करीत आहेत, असेही भाजपने म्हटले आहे.

दरम्यान, प्रत्येक निवडणुकीपूर्वी प्रार्थना केली जाते, मात्र या वेळी प्रार्थनेवर राजकारण केले जात आहे, असे आर्चबिशप यांचे सचिव फादर रॉबिन्सन रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

यावर धर्म किंवा पंथाच्या आधारावर भारतात कोणाहीविरुद्ध भेदभाव केला जात नाही आणि असे प्रकार देशात कधीही सहन केले जाणार नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. आर्चबिशप यांनी नक्की काय म्हटले आहे त्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, असेही राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

कीर्तनाने उत्तर देणार – गिरिराजसिंह

आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार निवडून येऊ नये यासाठी देशभरातील पाद्रींनी प्रार्थना करावी, असे आवाहन करणारे आर्चबिशप अनिल काऊटो यांना केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदी यांच्याविरोधात जर ते प्रार्थना करणार असतील तर आम्ही मोदींसाठी कीर्तन आणि पूजा करू, असे गिरिराजसिंह यांनी स्पष्ट केले आहे.