ममता बॅनर्जी यांची जोरदार टीका

सिलिगुडी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उलटवार करताना आपण पाकिस्तानचे राजदूत आहात की भारताचे पंतप्रधान असा सवाल केला. त्या सिलीगुडी येथे एका सभेत बोलत होत्या.

कर्नाटक येथे एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सीएए आणि एनआरसी विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांनी पाकिस्तानात होणाऱ्या अत्याचारांबाबत घोषणाबाजी करायला हवी असा सल्ला दिला होता, त्यामुळे चिडलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना हा सवाल केला. त्या म्हणाल्या, भारत एक मोठा देश असून त्याची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहे. तुम्ही वारंवार भारताची पाकिस्तानशी का तुलना करता? तुम्ही पाकिस्तानचे राजदूत (अ‍ॅम्बेसिडर) आहात की भारताचे पंतप्रधान? तुम्ही भारताला विसरला आहात काय की तुम्हाला वारंवार पाकिस्तानविषयी बोलावे लागते, असा प्रश्न बॅनर्जी यांनी विचारला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंत ७० वर्षांनी लोकांना त्यांचे राष्ट्रीयत्न सिद्ध करावे लादत असेल तर त्याच्यासारखी लाजीरवाणी कोणती बाब नाही, असेही त्या म्हणाल्या.

महागाई, बेरोजगारी सारख्या देशातील ज्वलंत समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच पंतप्रधान वारंवार पाकिस्तानविषयी बोलत असल्याचाही आरोप ममता यांनी केला.