भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) मार्शल आणि ५ स्टार रँक प्राप्त अर्जन सिंह यांना हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ९८ वर्षीय अर्जन सिंह यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आयएएफने ट्विटरवरून दिली आहे. आयएएफचे मार्शल अर्जन सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रूग्णालयात उपचार सुरू आहेत, असे ट्विट आयएएफने केले आहे. दरम्यान, अर्जन सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी रूग्णालयात धाव घेतली.

शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्यासह सीतारमण आणि हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनवा हेही रूग्णालयात गेले होते. हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंह यांना पाहण्यासाठी आरअँडआर रूग्णालयात गेलो होतो. त्यांची प्रकृती गंभीर आहे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली, असे ट्विट मोदींनी केले. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत असून अर्जन सिंह यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, असे म्हटले.

फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी आहेत. त्यांच्या ९७ व्या वाढदिवसादिवशी म्हणजे २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाई दलाच्या एअर बेसला त्यांचे नाव देण्यात आले होते. हवाई दलाचे पानागड विमानतळ आता अर्जन सिंह यांच्या नावाने ओळखले जाते. जिवंतपणी एका विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव अधिकारी आहेत.

आपल्या गौरवशाली कारकीर्दीत त्यांनी ६० विविध प्रकारची विमाने उडवली होती. १९६९ मध्ये सेवानिवृत्त होतानाही त्यांनी विमानाचे उड्डाण करून आपल्यातील जोश कमी झाला नसल्याचे दाखवून दिले होते. ते जेव्हा एअर स्टाफचे प्रमुख होते त्या वेळी आयएएफमध्ये सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि असॉल्ट हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला होता.