भारताच्या डीआरडीओने विकसित केलेल्या अर्जुन एम के-२ या रणगाड्यावरुन क्षेपणास्त्र डागता येणे शक्य होणार आहे. या रणगाड्याची क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून पुढील वर्षापर्यंत हे शक्य होणार आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे नवे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र रणगाड्यावरुन डागता येणार आहे. २०१३ मध्ये अर्जुन एक के-२ रणगाड्यावर इस्त्रायली बनावटीचे क्षेपणास्त्र बसवण्यात आले होते. मात्र, ते लष्कराच्या गरजेची पुर्तता करु शकले नव्हते. त्यानंतर अनेक वर्षे हा महत्वाकांक्षी कार्यक्रम रखडला होता.

सध्या डीआरडीओकडून सुरु असलेल्या क्षेपणास्त्र निर्मिती चाचणी टप्प्यात असून लष्कराच्या मागणीप्रमाणे त्यात बदल करण्यात येत आहेत. १२०० मीटर्स पेक्षा कमी टप्प्यावरील टार्गेट गाठण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

भारतीय लष्कराने इस्त्रायली बनावटीचे लहाट (लेझर होमिंग अँटी टँक) क्षेपणास्त्र नाकारले होते. या क्षेपणास्त्राची रेंज ही १५०० मीटर्सच्या पलिकडे होती. लष्कराने आणि डीआरडीओने या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. याचा निर्मिती खर्च २० कोटी रुपये इतका होता. सुरुवातीला लष्कराने ५०० मीटर्स आणि ५ किमी इतक्या रेंजची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यात बदल करुन ती १२०० मीटर्स आणि ५ किमी इतकी ठेवण्यात आली.

‘डीआरडीओ’ने विकसीत केलेल्या अर्जुन रणगाड्यामध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात रणगाड्याच्या ८० फिचर्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रणगाड्याची तोफगोळा डागण्याची क्षमता चांगली झाली आहे. इंटेग्रेटेड एक्स्प्लोजिव रिअॅक्टिव आरमर, अॅडव्हान्स लेझर वॉर्निंग, काऊंटर मेजर सिस्टीम, सुरुंग पेरण्याच्या क्षमतेत वाढ, रिमोटने वापरता येणारी विमानविरोधी हत्यारे, आधुनिक नेविगेशन सिस्टीम तसेच रात्रीच्या वेळीच्या दृश्यमानतेची क्षमता वाढवण्यात आली आहे.