उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच आता अभिनेत्यांचाही आधार घेण्याची रणनिती आखली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपसाठी प्रचार करणार आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून उत्तरप्रदेशमध्ये यश मिळवून राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्याचे भाजपचे मनसुबे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशमध्ये प्रचारसभा घ्यायला सुरुवात केली आहे. यासोबतच आता भाजप अभिनेत्यांचा आधार घेणार आहे. अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपसाठी प्रचार करणार आहेत. सुरुवातीला हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र अर्जुन रामपालने सक्रीय राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मी काही राजकारणी नाही, मी राजकारणासाठी इथे आलो नाही. मी फक्त भाजपला कसा पाठिंबा देता येईल यासाठी इथे आलो’ असे त्याने सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा- ११ फेब्रुवारी, दुसरा टप्पा- १५ फेब्रुवारी, तिसरा टप्पा- १९ फेब्रुवारी, चौथा टप्पा- २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा- २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा-४ मार्च तर सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल. निवडणूक आयोगाने यंदा राज्यांसाठी खर्चाची मर्यादी ही वेगळी ठेवली आहे. उत्तर प्रदेशसाठी २८ लाख रूपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये सध्या समाजवादी पक्षाची सत्ता आहे. पण विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यात वाद सुरु आहे. अशा स्थितीत भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी जोर लावला आहे.