सैन्य दलांकडून हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र अशा घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याची मागणी होत आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या ‘प्रोजेक्ट चीता’ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत सरकारला ३,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘प्रोजेक्ट चीता’ अंतर्गत तिन्ही सैन्य दलांच्या ९० हेरॉन ड्रोन्सना अपग्रेड करण्याची योजना आहे.

यामध्ये हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, हवेतून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक प्रहार करणारे मिसाइल आणि रणगाडाविरोधी मिसाइल्सनी सुसज्ज करण्याची योजना आहे” सरकारमधील सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीमध्ये या प्रस्तावाचा आढावा घेतला जाणार आहे. शत्रूच्या ठिकाणांवर, हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच हेरॉन ड्रोन्स गरज पडल्यास हल्ला करण्यासही सक्षम असले पाहिजे असे सशस्त्र दलांनी प्रस्तावामध्ये सुचवले आहे.

आणखी वाचा- रात्रीच्या अंधारात डोंगर रांगांमध्ये ‘राफेल’ची गर्जना, ‘मिशन लडाख’ची तयारी सुरु

भारत सध्या टेहळणीसाठी इस्रायली बनावटीचे हेरॉन ड्रोन्स वापरतो. चीनला लागून असलेल्या लडाख सीमेवर लष्कर आणि एअर फोर्स दोघांनी फॉरवर्ड लोकेशन्सवर चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या होरॉन ड्रोन्सची तैनाती केली आहे. चिनी सैन्य प्रत्यक्षात कितपत मागे हटलं आहे तसेच चीनने त्यांच्याहद्दीत आतमधल्या बाजूला किती सैन्य तैनाती करुन ठेवलीय, हे हेरॉन ड्रोनमुळे समजते. पारंपारिक युद्धाबरोबरच दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सुद्धा या UAV ड्रोन्सचा वापर होऊ शकतो.