छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्य़ातील एका चर्चवर दोन सशस्त्र अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी हल्ला चढविला आणि बायबल आणि अन्य सामग्री जाळली, इतकेच नव्हे तर या हल्लेखोरांनी चर्चमधील धर्मोपदेशक आणि त्यांच्या गर्भवती पत्नीवरही हल्ला केला.
परपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजी मतागुडी पारा गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. धर्मोपदेशक दीनबंधू समेली यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदविण्यात आला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी या परिसरात अहोरात्र गस्त घालण्यात येत आहे. हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास बस्तरचे पोलीस अधीक्षक आर. एन. दास यांनी व्यक्त केला.
आपण ख्रिश्चन समाजातीलच आहोत आणि आपल्याला प्रार्थना करावयाची आहे, असे सांगून दोन जण चर्चमध्ये आले. त्यानंतर त्यांनी धर्मोपदेशकांवर हल्ला चढविला आणि ज्वलनशील द्रवपदार्थ बायबलवर टाकला आणि त्याला आग लावली. त्याचप्रमाणे चर्चमधील लाकडी
सामान आणि अन्य धार्मिक साहित्यालाही आग लावली, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, हा हल्ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप छत्तीसगड ख्रिश्चन मंचचे अध्यक्ष अरुण पन्नालाल यांनी केला आहे. हे प्रकरण पोलीस दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.