17 December 2017

News Flash

आर्मस्ट्राँगचे ते उद्गार सरावाने ‘उत्स्फूर्त’!

चंद्रावर पहिले पाऊल टाकल्यानंतर नील आर्मस्ट्राँग या अंतराळवीराने उद्गार काढले, ‘दॅट्स् वन स्मॉल स्टेप

लंडन, वृत्तसंस्था | Updated: January 4, 2013 3:10 AM

चंद्रावर पहिले पाऊल टाकल्यानंतर नील आर्मस्ट्राँग या अंतराळवीराने उद्गार काढले, ‘दॅट्स् वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाइंड’.. हे उद्गार नेमके काय होते, यावरून पुढील चार दशके उलटसुलट चर्चेला तोंड फुटले होते तर हे उद्गार उत्स्फूर्त नव्हते तर नीलने त्याचा आधी बराच सराव केला होता, असे त्यांच्या भावानेच जाहीर केले आहे. बीबीसीच्या विशेष कार्यक्रमातून या गोष्टींवर पुन्हा प्रकाश पडला आहे.
चंद्रावर पाऊल टाकताच आपण ‘दॅट्स् वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाइंड’ (एका माणसाचं हे छोटे पाऊल पण मनुष्यजातीची हनुमानउडी) असे म्हणालो होतो, असा नील आर्मस्ट्राँग यांचा दावा होता. मात्र ‘नासा’ने त्यातील व्यक्तीवाचक असा ‘अ’ गाळला आणि ‘दॅट्स् वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाइंड’ (माणसाचं छोटं पाऊल पण मनुष्यजातीची हनुमानउडी) असे केले, असेही आर्मस्ट्राँग म्हणाले. ‘नासा’ने मात्र त्या संदेशात नील यांनी ‘अ’ उच्चारलाच नव्हता, असा दावा केला आणि आपणही पृथ्वीवर परतल्यावर ध्वनीमुद्रण ऐकले तेव्हा तो ‘अ’ ऐकू आला नाही, अशी कबुली नील यांनी १९९९ मध्ये दिली. मात्र आपण तो शब्द उच्चारलाच होता, असा दावा त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी, गेल्या ऑगस्टमध्ये केला होता.
त्यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी ते वाक्य उत्स्फूर्त नव्हते, याची कबुली दिली आहे. त्यांचे भाऊ डीन आर्मस्ट्राँग यांनी सांगितले की, अपोलो ११ यानासाठी केप कार्निवल येथे जाण्याआधी नीलने हे वाक्य तयार केले होते आणि ते मला वाचायलाही दिले होते. हे वाक्य तुला कसे वाटते, असे त्याने विचारले. ‘हे भन्नाटच आहे’, असे मी त्याला म्हणालो.
त्या वाक्यात ‘अ’ हा शब्द होता पण ते वाक्य म्हणून दाखवतानाही तो शब्द उच्चारायला नील विसरत होता. मी त्याला त्याची जाणीव करून देत असे आणि तो पुन्हा नव्याने ‘अ’सकट वाक्य म्हणत ते घोकत असे, असेही डीनने सांगितले.
लिंकन विद्यापीठाचे डॉ. ख्रिस्तोफर रिले यांनी बीबीसीसाठी आर्मस्ट्राँग यांच्या जीवनाचा वेध घेणारा लघुपट तयार केला आहे. ते म्हणाले, लहानपणी नील ‘मदर मे आय..’ हा खेळ खेळत असे. त्यात ‘मदर मे आय टेक वन स्मॉल स्टेप’ असे वाक्य गायले जाई. ते वाक्य नीलच्या डोक्यात असले पाहिजे. त्यातूनच हे ऐतिहासिक ठरलेले वाक्य त्याच्या तोंडून आले असावे.

First Published on January 4, 2013 3:10 am

Web Title: armstrong lied about origin of his one small step quote
टॅग Armstrong