हेरगिरीबाबतच्या सर्व धोक्यांबाबत आपण सदैव दक्ष व संवेदनशील असून, आयएसआयशी संबंधित हेरगिरी रॅकेटशी संबंधित असलेल्या सैन्यातील एका कर्मचाऱ्याला गेल्या आठवडय़ात सिलिगुडी येथून अटक करण्यात आल्यानंतर आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आलेली आहे, असे लष्कराने शनिवारी सांगितले.
पूर्व कमांडमध्ये झालेल्या कारवायांच्या प्रकारांबाबत आम्हाला माहिती आहे. अशा बाबतीत आम्ही नेहमीच सज्ज असतो आणि त्यादृष्टीने पुरेशा उपाययोजनाही नियमितपणे केल्या जातात. सर्व संभाव्य धोक्यांबाबत आम्ही खबरदार, जागरूक व संवेदनशील असतो, असे लष्कराच्या पूर्व कमांडचे मेजर जनरल ए. एस. बेदी यांनी पत्रकारांना सांगितले.
आयएसआयच्या संशयित हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याबद्दल सैन्यातील हवालदार फरीद खान याला गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आल्यामुळे सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत बेदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. शिपायांना कुठलीही संवेदनशील माहिती पाहायला मिळत नाही.
त्यांना कळणारी माहिती आधीच सार्वजनिक असते किंवा आमचे नुकसान होईल इतपत संवेदनशील नसते, असे दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.