जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. लष्कर आणि राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत कुलगामसह तीन भागांमधून तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यामधील एक दहशतवादी जखमी आहे. ऑपरेशन हलनकुंडच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जोपर्यंत आवश्यकता असेल, तोपर्यंत हे अभियान सुरुच ठेवण्यात येईल, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबरपासून ऑपरेशन हलनकुंड सुरु असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘ऑपरेशन हलनकुंडच्या अंतर्गत आतापर्यंत तीन दहशतवादी पकडण्यात आले आहेत. यामधील एक दहशतवादी जखमी अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत,’ असे खान यांनी सांगितले. ‘काश्मिरी तरुणांना आमिष दाखवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेतले जात आहे. त्यासाठी पाकिस्तानमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार सुरु आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस आणि लष्करात चांगला समन्वय असून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन हलनकुंडच सुरुच राहिल, असे त्यांनी सांगितले.

स्थानिकांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन लष्कराने केले आहे. काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यात येत असल्याने अनेक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील २० वर्षांचा माजिद खान दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. जिल्हा स्तरावरील फुटबॉलपटू असलेला माजिद अनंतनागचा रहिवासी होता. माजिदने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याने त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.