चीनसोबत वाढता तणाव तसंच गोपनीय माहितीच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून ८९ अॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. लष्कराने टिंडरसारखे अॅपदेखील डिलीट करण्यास सांगितलं आहे. याशिवाय काऊचसर्फिंग आणि बातम्यांसाठी वापरलं जाणारे डेलीहंट हे अॅपही डिलीट करण्यास सांगण्यात आलं आहे.
१५ जुलैपर्यंत अॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.
दरम्यान भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापरण्यासाठी मात्र मुभा दिली आहे. व्हॉट्सअॅप, टेलीग्राम, सिग्नल, युट्यूब, ट्विटर यांचा वापर करण्यासाठी अधिकारी आणि जवानांना परवानगी आहे. मात्र या ठिकाणी आपल्या लष्करामधील सेवेसंबधी माहिती उघड करु नये ही अट आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 7:39 am