लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. पाकिस्तानकडून सतत नापाक कारवाया सुरू आहेत. ते न सुधरल्यास त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे रावत यावेळी म्हणाले. कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

पाकिस्तानी सैन्य वारंवार दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, देशाच्या संरक्षणासाठी आम्ही तत्पर आहोत. तसेच पाकिस्तानच्या कारवायांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, यात कोणतेही दुमत नसल्याचे रावत म्हणाले. भविष्यात कोणतेही युद्ध झाले तर ते विनाशकारी असेल आणि त्याचे परिणाम अंदाजापेक्षाही अधिक भयावह असतील. तेव्हा तंत्रज्ञानाची भूमिका ही महत्त्वाची असेल. अशाप्रकारच्या युद्धाने होणारी हानी ही मोठी असेल. भविष्यात होणाऱ्या युद्धांना ‘हायब्रिड युद्ध’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच भविष्यातील लढायांसाठी आपल्याला तयार रहावे लागेल, असेही ते म्हणाले.

सैन्याला मल्टी स्पेक्ट्रम वॉरसाठी कायम तयार रहावे लागेल. तंत्रज्ञानामुळे युद्धाच्या परिस्थितींमध्येही बदल झाला आहे. आज युद्धात तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. 6 जुलै रोजी चीनी सैनिक डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात घुसले होते. यावेळी भारतीय जमिनीवर चीनी झेंडे फडकावण्यात आल्याचंही सांगण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे अशावेळी सीमारेषा पार करुन घुसखोरी करण्यात आली जेव्हा लदाखमधील काही लोक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. याबाबत विचारले असता रावत यांनी या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले.