चीन आज या स्थितीत आहे की, ते अमेरिकेलाही आव्हान देऊ शकतात. कारण त्यांनी सैन्याची ताकद आणि अर्थव्यवस्था एकाच वेळी वाढली पाहिजे हे लक्षात ठेवले. त्यामुळेच आज ते आंतरराष्ट्रीय मंचावर मजबुतीने उभे राहून अमेरिकेला आव्हान देत आहेत, अशी माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिली. चीनच्या या भूमिकेमुळेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष हिंदी महासागराकडे गेले आहे. जसजसा चीनचा प्रभाव वाढत आहे, तसतसे जगभरातील देशांनी भारताकडे पाहण्यास सुरूवात केली आहे. चीनच्या वाढत्या ताकदीला संतुलित करणारा देश भारत होऊ शकतो का, हे ते पाहत आहेत. हे फक्त चीनच्या दादागिरीमुळे आहे, असे म्हणत तुमची अर्थव्यवस्था वाढत असेल तर तुम्हाला आपल्या देशात होत असलेल्या गुंतवणुकीची सुरक्षाही निश्चित करावी लागेल, असा अर्थविषयक सल्लाही दिला.

संरक्षण खर्चाबाबत बोलताना ते म्हणाले की, संरक्षणावरील खर्च देशावरील एक बोजा असल्याची एक सर्वसाधारण धारणा आहे. संरक्षणावर जो काही खर्च केला जातो. त्याचा परतावा मिळत नाही, हे मिथक दूर करायचे आहे. भूदल, वायूदल आणि नौदल या तिघांना समान पद्धतीने मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी त्यांनी पाकिस्तानलाही इशारा दिला. त्यांनी जर सीमापार हालचाली वाढवल्या तर आमच्याकडे पुढच्या पातळीवर जाण्याचा पर्याय खुला आहे. पाकिस्तानला माहिती आहे की, ते दहशतवादी हालचाली वाढवू शकत नाहीत. सीमेपार बसलेले लोक आमच्यापेक्षा जास्त नुकसान सहन करत आहेत. आम्ही हे निश्चित केले आहे की, त्यांचेही (पाकिस्तान) समान नुकसान व्हावे. जर त्यांना वाटत असेल की त्यांचे जास्त नुकसान झाले तर आम्ही आमच्या अटींवर शस्त्रसंधीबाबत बोलू. आम्ही पाकिस्तानच्या अटींवर शस्त्रसंधीबाबत बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी चीन आणि डोकलामविषयीही भाष्य केले.