लष्करप्रमुख जनरल रावत यांचे वक्तव्य; राजकीय मुद्दय़ांवर बोलल्याबद्दल विरोधी पक्षांची टीका

नवी दिल्ली : विद्यापीठातील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या जमावाला नेते आपल्या शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार करण्यास प्रवृत्त करत असतील, तर त्याला नेतृत्व म्हणता येऊ शकत नाही, अशा शब्दांत देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी टीका केली.

येत्या ३१ डिसेंबरला लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार असलेले बिपिन रावत यांनी राजकीय मुद्दय़ाबाबत वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

‘‘जे लोक लोकांना चुकीच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करतात, ते नेते नव्हेत. सध्या मोठय़ा संख्येत विद्यापीठातील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच घडत आहे. काही लोक जमावाला आपल्या शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. हे काही नेतृत्व नव्हे,’’ असे एका आरोग्यविषयक परिषदेत बोलताना लष्करप्रमुख म्हणाले.

‘नेता म्हणजे अशी व्यक्ती, जी तुम्हाला योग्य दिशेने नेते, तुम्हाला योग्य तो सल्ला देते आणि ज्या लोकांसाठी तुम्ही जगता त्यांची तुम्ही काळजी घ्याल हे निश्चित करते’, असेही जनरल रावत म्हणाले.

जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिलेच सैन्यदले प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) होणार हे जवळजवळ निश्चित असून, ते संरक्षणविषयक मुद्दय़ांवर सरकारचे सल्लागार असतील. लष्करप्रमुखांच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत ते राजकीयदृष्टय़ा तटस्थ न राहिल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत.

या वक्तव्याबद्दल राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली. राजकीय मुद्दय़ांवर न बोलण्याच्या भारतीय लष्कराच्या गेल्या ७० वर्षांच्या परंपरेपासून जनरल रावत यांनी फारकत घेतली आहे. पाकिस्तान व बांगलादेशातही असेच घडले आहे, असे मानवाधिकार कार्यकर्ते योगेंद्र यादव म्हणाले.

जनरल रावत यांनी सीएएच्या विरोधातील निदर्शनांबद्दल बोलणे हे घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे. आज लष्करप्रमुखांना राजकीय मुद्दय़ांवर बोलण्याची मुभा देण्यात आली, तर उद्या लष्कराने सत्ता ताब्यात घेण्याचीही त्यांना मुभा मिळेल, असे ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजेश कलप्पा यांनी केले.

नेतृत्व म्हणजे स्वत:च्या पदांच्या मर्यादांची जाणीव असणे होय. नागरिक हे सर्वोच्च असल्याची कल्पना समजून घेणे, तसेच आपण नेतृत्व करत असलेल्या संस्थेच्या निष्ठेचे संरक्षण करणे म्हणजे नेतृत्व होय, अशा शब्दांत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रावत यांच्यावर टीका केली.