पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्याबाबत चीनच्या ताज्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, लडाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा र्सवकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु असं सांगत चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल असा विश्वास एएनआयशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत”.

“नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आलं आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम – रावत

“जवानांना मनौधैर्य उंचावलेलं आहे. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपले जवान त्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु,” असं लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर… बिपिन रावत यांचा पाकिस्तानला इशारा

“गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून चीनसोबत लष्कर तसंच राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहे. सध्या चर्चा सुरु असून भविष्यातही सुरु राहतील,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी यावेळी चर्चेच्या माध्यमातून भारत आणि चीन आपापसातील वाद मिटवतील असा विश्वास व्यक्त केला. तसंच परिस्थिती बदलणार नाही याची आम्ही खात्री करु असंही ते म्हणाले आहेत.