प्रत्येक लष्कराला संघर्षांसाठी तयार राहावेच लागते आणि ते त्याचे काम आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी सांगितले.

देशाच्या सशस्त्र फौजांनी आपल्या युद्धविषयक क्षमता वाढवून युद्धासाठी तयार राहावे असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अलीकडेच त्यांना सांगितले होते, त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला रावत उत्तर देत होते.

प्रत्येक लष्कराला संघर्षांसाठी तयारी करावी लागते, ते त्याचे काम आहे. त्यामुळे कुणी तसे म्हणण्यात नवे काहीच नाही. मलाही तयारीत राहावे लागते. शांततेच्या काळात आम्ही सर्व प्रशिक्षण घेऊन कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करतो, त्यात काहीच नवे नाही, असे रावत म्हणाले.

भारत व चीन या दोघांच्याही फौजा डोकलाममध्ये आहेत, मात्र त्या अगदी समोरासमोर नाहीत, असे रावत यांनी नुकतेच बेळगावमध्ये म्हटले होते.

फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा व जनरल के. एस. थिमय्या यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यासाठी कोडागू जिल्ह्य़ातील गोनिकोप्पल येथील कावेरी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी जनरल रावत येथे आले होते. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते. करिअप्पा यांच्याप्रमाणेच कोडागू जिल्ह्य़ाचे रहिवासी असलेले थिमय्या हेही नंतर लष्करप्रमुख झाले होते.