बांगलादेशींकडून होत असलेल्या घुसखोरीवरून लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे. ईशान्य बांगलादेशमधून होत असलेल्या घुसखोरीमागे आपले पश्चिमकडील शेजाऱ्यांची छुपी निती जबाबदार असल्याचा आरोप करत याप्रकरणी आपल्या पश्चिमेकडील शेजाऱ्याला उत्तरेकडील शेजाऱ्याची साथ मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. ईशान्य भारतात आयोजित एका परिषदेत ते बोलत होते. ईशान्य भारतामध्ये बांगलादेशींकडून होणारी घुसखोरी आणि या परिसरातील लोकसंख्येत होत असलेले बदल दाखवण्यासाठी रावत यांनी बदरुद्दीन अजमल याच्या एआययूडीएफ पक्षाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, देशात जनसंघाचा (भाजपाचा) विस्तार ज्या वेगाने झाला नाही त्याच्या अनेकपटींनी आसाममध्ये एआययूडीएफचा विस्तार झाला आहे.

ईशान्य भारतातील लोकांना देशाच्या मुख्यधारेत आणणे हेच या भागातील समस्यांसाठी एकमेव उत्तर असल्याचे ते म्हणाले. या भागात सुनियोजित पद्धतीने इस्लामिक बहुल भाग बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अरूणाचल प्रदेशच्या लोकांचे त्यांनी कौतुक केले. येथील लोक आपल्यापेक्षा शुद्ध हिंदी बोलतात. ते स्कूल नव्हे तर विद्यालय असे संबोधतात, असे ते म्हणाले. तत्पूर्वी नौदल प्रमुखांनी चीनबरोबर मतभेद असतानाही गेल्या अनेक दशकांपासून वास्तविक नियंत्रण रेषेवर शांतता कायम असल्याचे म्हटले.