बंगळूरु : लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या एलसीए ‘तेजस’मधून उड्डाणाचा अनुभव घेतला. तेजस हे हिंदुस्थान एरोनॉटिक्सने लि.ने (एचएएल) बनवलेले हलके लढाऊ विमान आहे. तेजस हे विस्मयकारक लढाऊ विमान असल्याचा निर्वाळा रावत यांनी दिला. बंगळूरु येथे सुरू असलेल्या एरो इंडिया, एअर शोदरम्यान रावत यांनी तेजसमधून उड्डाण केले. या लढाऊ विमानाचा हवाई दलातील समावेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

एचएएलने तयार केलेल्या तेजसला अंतिम उड्डाणाची मंजुरी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिपिन रावत यांनी दोन आसनांच्या या विमानात वैमानिकाच्या मागे बसून उड्डाणाचा अनुभव घेतला. येलहांका हवाई तळावर उड्डाण केल्यानंतर हे विमान विस्मयकारक असल्याचे रावत म्हणाले. तेजसमधून उड्डाण हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे, तेजस विमान उत्तम असून अचूकतेने लक्ष्यभेद करण्याची त्याची क्षमता आहे. तेजस हे छोटे, हलके लढाऊ विमान असले तरी अन्य मोठय़ा लढाऊ विमानांप्रमाणे तेही अत्याधुनिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. तेजसमधून शत्रूच्या विमानावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करता येऊ शकतो.