भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधला. तिन्ही सैन्य दलात समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आमचे जवान आमची सर्वात मोठी ताकद आहे, भविष्यातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही सज्ज असल्याचेही नरवणे यांनी यावेळी सांगितले आहे.

आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत व भविष्यासाठी प्रशिक्षणावर देखील भर असणार आहे. सैन्य दलात देखील समन्वयावर का होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

‘सीडीएस’ यशस्वी ठरवणार –
चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) आणि सैन्यदलाच्या प्रकरणांबाबत विभागाची निर्मिती एकत्रिकरणाच्या दिशेने मोठं पाऊल आहे. हे यशस्वी ठरेल यासाठी आम्ही पुर्णपणे काळजी घेणार आहोत. सैन्य दल म्हणून आम्ही भारताच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेत आहोत, ती आमच्या प्रत्येक कार्यासाठी मार्गदर्शन करते. राज्यघटनेतील न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुभाव आमचे मार्गदर्शन करतात. उत्तर सीमेवरील वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यास आम्ही सज्ज असल्याचहे यावेळी नरवणे यांनी सांगितले.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.